वाहतूक दळणवळण

दीड हजारांहून अधिक वेळा विनाकारण साखळी खेचल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यांतील घटना

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०१ :- उपनगरी लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील आपत्कालीन साखळी प्रवाशांकडून विनाकारण खेचल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्यावर होत आहे. साखळी खेचल्यानंतर रेल्वेगाडी पुन्हा सुरू होण्यासाठी किमान चार ते पाच मिनिटे किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो. त्यामुळे अन्य रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होते.

हेही वाचा :- मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांना अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच

एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांत मुंबई विभागात आपत्कालीन साखळी खेचण्याच्या १ हजार ७०६ घटना घडल्या. त्यामुळे मध्य रेल्वेवरील २ हजार ३१९ लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.‌ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली, कसारा, पनवेल, इगतपुरी, लोणावळा या मुंबई विभागात मे, ऑगस्ट, ऑक्टोबर या महिन्यांत साखळी खेचण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

हेही वाचा :- ट्विटरकडून भारतातील मोजक्या लोकांना ‘ट्विट एडिट’ पर्याय उपलब्ध

सहप्रवासी वेळेत न येणे, फलाटावरच थांबणे, भ्रमणध्वनी गाडीतून खाली पडणे, गाडीचा थांबा ठरावीक ठिकाणी नसताना तिथे उतरण्यासाठी, फलाटावर सामान विसरणे, अपंगाच्या डब्यातून अन्य प्रवाशांचा प्रवास आदी कारणांमुळे साखळी खेचण्याचे प्रकार घडतात, असे सांगण्यात आले.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *