वनिता विश्व

महिला पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आई’ उपक्रम

राज्य पर्यटन महामंडळ आणि पर्यटन विभागाची योजना
मुंबई दि.०१ :- महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि राज्याचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आई’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.‌
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून  राज्यभरात काही हॉटेलांशी करार करण्यात येणार आहे.‌ त्यांना ‘महिला मैत्री’ दर्जा दिला जाणार आहे. ‘आई’ उपक्रमासाठी राज्य पर्यटन महामंडळातर्फे खास संकेतस्थळही  तयार केले जाणार आहे, असेही लोढा यांनी सांगितले.‌
‘आई’ या उपक्रमांतर्गत कोणत्याही सहलीचे आयोजन करताना महिलांसाठी विशेष बसची सुविधा देताना त्यात ‘जीपीएस’ सुविधाही दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून हॉटेल, रिसोर्ट, रेस्टॉरंट, वाहतूक, विपणन,  पर्यटक मार्गदर्शक यांसारख्या अनेक क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच महिलांनी एकत्र येऊन प्रवासी/पर्यटन गट  स्थापन केला तर त्यांना अनुदान देण्याचाही विचार असल्याचे  लोढा म्हणाले.
दरवर्षी ‘आई’ महोत्सवाचे आयोजन
महिलांसाठी महिलांकडून आणि महिलांनी’ या तत्त्वावर ‘आई’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिलांच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळेही निवडण्यात येणार आहेत. या सहलींचे आयोजन करताना उपलब्ध होणाऱ्या रोजगारांसाठीही महिलांचीच निवड केली जाणार आहे. महिला पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी  ‘आई’ पर्यटन महोत्सवाचे आयोजनही केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *