मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.३० :- मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातून परतीचा पाऊस लांबल्यामुळे ढगाळ वातावरण राहिले. या ढगाळ वातावरणामुळे राज्यभरात ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या खालीच होते. त्यामुळे यंदाही ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी मिळाली. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र आणि देशातून मोसमी पाऊस माघारी परतला होता. मात्र त्यानंतर सलग तीन वर्षे त्याचे माघारी फिरणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे. २०२० मध्ये २८ ऑक्टोबर रोजी पाऊस माघारी फिरला तर २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे २५ ऑक्टोबर आणि २३ ऑक्टोबर रोजी मोसमी पाऊस महाराष्ट्रसह देशातून माघारी गेला.
यंदा महाराष्ट्रातून १४ ऑक्टोबरला मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र त्याआधी आणि नंतरही राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला. मुंबई परिसर आणि कोकणात ऑक्टोबर महिन्यात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात ३५ ते ३८ अंशापर्यंत कमाल तापमानाची नोंद होते.
मात्र गेल्या तीन वर्षांपासून या परिस्थितीत बदल झाला असून यंदाही कमाल तापमानात फार मोठी वाढ झाली नाही. मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर लगेचच तापमानात घट होऊन थंडी पडायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली गेले आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानातील ही घर सगळ्यात जास्त आहे गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. शनिवार २९ ऑक्टोबर या दिवशी औरंगाबाद येथे १२.०९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी आहे.