साहित्य- सांस्कृतिक

महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव विकसित करण्यासाठी पाठपुरावा करू राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आश्वासन

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- हिंदी साहित्यविश्र्वात महावीर प्रसाद द्विवेदी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर या गावाचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिले.

डॉ राम मनोहर त्रिपाठी सेवा समिती आणि श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर प्रसाद द्विवेदी स्मृती संरक्षण अभियान रजत जयंती सन्मान व मराठी – हिंदी कवी संमेलन गुरुवारी राजभवन येथे आयोजिन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी आमदार राजपुरोहित,  गीतकार मनोज मुंतशीर,  डॉ मंजू पांडे, अनुराग त्रिपाठी, राजीव नौटियाल, समाजसेवक प्रशांत शर्मा, अनिल गलगली, ब्रिजमोहन पांडे यांसह साहित्यिक, पत्रकार यावेळी मान्यवर उपस्थित होते.

ज्याप्रमाणे संत तुलसीदास, मीराबाई, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गुरुनानक यांना विसरता येणे शक्य नाही, त्याचप्रमाणे हिंदी भाषेला प्रचलित रूप देणाऱ्या महावीर प्रसाद द्विवेदी आणि हजारी प्रसाद द्विवेदी यांना विसरता येणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले.

प्रसिद्ध साहित्यिक, माजी मंत्री डॉ राम मनोहर त्रिपाठी मुंबई महानगरीत आले व  महाराष्ट्राशी समरस झाले. डॉ राम मनोहर त्रिपाठी यांनी साहित्य, समाजकारण व राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ राम मनोहर त्रिपाठी यांच्या रचना संगीतबद्ध केल्याबद्दल भजन सम्राट अनुप जलोटा तसेच  आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मृति संरक्षण अभियान संस्थेचे निमंत्रक गौरव अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला.

काव्य संमेलनात रामदास फुटाणे, सुनील जोशी, योगेंद्र शर्मा, राजीव राज, ज्योती त्रिपाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अनिल त्रिवेदी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *