टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या किल्ले बांधणी स्पर्धेत विवेकानंद सोसायटीचा किल्ला प्रथम
डोंबिवली दि.२७ :- टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत विवेकानंद सोसायटीने (सारस्वत कॅालनी, डोंबिवली पूर्व) तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. सोसायटीने ‘किल्ले विशाळगड ते किल्ले पन्हाळगड’ ही सुमारे ६० फूट लांबीची प्रतिकृती तयार केली होती. स्पर्धेत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातून २२ स्पर्धक सहभागी झाले होते.
बाळ गोपाळ मित्र मंडळ, मढवी शाळेजवळ यांनी बनविलेल्या ‘किल्ले रायगड’च्या प्रतिकृतला द्वितीय पारितोषीक तर डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा, राजाराम निवास इमारतीमधील बालमावळ्यांनी साकारलेला ‘मिर्जन दूर्ग’ आणि दत्तनगर, डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर बॅाईज या संघाच्या ‘किल्ले परांडा’ला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक- बालाजी वाडी, देवीचा पाडा- ‘सिंहगड’ प्रतिकृतीला तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक शिवबा मावळा संघ, नवनाथ धाम सोसायटी, जिजाईनगर- ‘किल्ले खांदेरी’ या प्रतिकृतीला मिळाले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम यांनी काम पाहिले. किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जानेवारी आयोजित करण्यात येणा-या मकरोत्सवात होणार असल्याचे मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी सांगितले.