गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाण्यांचे जतन आवश्यक- राज्यपाल कोश्यारी
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२७ :- भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. तो जाज्वल्य आणि वैभवशाली असून प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी हा त्या इतिहासाचाच पुरावा आहे.
देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणी जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी येथे केले.
नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ आणि लेखक डॉ दिलीप राजगोर लिखित ‘रिपब्लिक कॉन्स ऑफ इंडिया’ (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले,
त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व नाणे संग्राहक दिनेशभाई मोदी, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष व नाणे संग्राहक पॉल अब्राहम तसेच अनेक नाणेशास्त्र विषयातील अभ्यासक उपस्थित होते.
डॉ दिलीप राजगोर यांनी नाण्यांच्या विश्वात मोठे संशोधन करुन भारत गणराज्य निर्मितीनंतरच्या नाण्यांची अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणल्याबद्दरला राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.
भारत गणराज्य झाल्यानंतर विविध टांकसाळींमध्ये घडवल्या गेलेल्या नाण्यांनी देशाची एकात्मता बळकट केली गेली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ दिनेशभाई मोदी यांनी केले.
तर जुनी नाणी जमविणे हा केवळ छंद नसून आपला इतिहास जाणून घेण्याचे एकमात्र माध्यम असल्याचे नाणे संग्राहक व हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी सांगितले.
राजगोर यांनीही मनोगत व्यक्त केले.