मुंबई आसपास मनोरंजन संक्षिप्त
‘घर बंदूक बिर्याणी’ची झलक प्रदर्शित
झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या आगामी चित्रपटाची झलक नुकतीच समाजमाध्यमांतून प्रदर्शित करण्यात आली. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दाखविली आहे.
तमाशातील मुलीच्या प्रेमाची कथा- लल्लाट
मॅक फिल्मस प्रॉडक्शन, ए एस डी डिझाइन, एम आर जोकर एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ लल्लाट ‘ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे करणार आहेत. तमाशातील नर्तकीच्या प्रेमाची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
‘हर हर महादेव’ची पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई
दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे अक्षय कुमारचा ‘राम सेतू’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हे दोन्ही हिंदी चित्रपटही ‘हर हर महादेव’ सोबत प्रदर्शित झाले होते. हा चित्रपट मराठीस अन्य पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेते सुबोध भावे यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.
झी मराठीच्या ‘फु बाई फू’ मध्ये ओंकार भोजने
झी मराठीवर’ फु बाई फू’ चे नवे पर्व लवकरच सुरू होत असून या कार्यक्रमात हास्य अभिनेता ओंकार भोजने विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात ओंकार सध्या काम करत आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत असून यात ओंकार महाराष्ट्रातील दोन राजकीय नेत्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ३ नोव्हेंबर पासून झी मराठीवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे.