कर्तव्यावरील शहीद ‘प्रकाशदुतां’चे स्मरण – वीज कंत्राटी कामगार संघातर्फे आयोजन
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- करोना काळात अखंड वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’, ‘महापारेषण’ महानिर्मिती वीज कंपनीतील ७० कंत्राटी कामगारांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) पुणे येथे रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पणती लावून या दिवंगत कामगारांना आदरांजली वाहण्यात आली.
या ७० कामगारांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. राज्य शासनाकडून या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात यावी. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी केली.
या वेळी संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण आदी उपस्थित होते.
—–