ठाणे जिल्ह्यातील सोमवारची पहाट गारेगार!
ठाणे दि.२४ :- दिवाळीच्या पहिल्या दिवसाची अर्थातच सोमवारची पहाट ठाणे जिल्ह्यात गारेगार ठरली. जिल्ह्यात मुरबाडमध्ये सर्वात कमी १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बदलापूर शहरात १६.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात परतीच्या पावसामुळे नागरिक, शेतकरी त्रस्त झाले होते. ऐन दिवाळीतही हा पाऊस पडला तर? या प्रश्नाने नागरिक, व्यापारी, दुकानदार काळजीत पडले होते.
मात्र रविवारी वेधशाळेकडून मुंबईसह संपूर्ण राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्याचे जाहीर केले. आणि लगेचच सोमवारी जिल्ह्यातील नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव आला. उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि स्वच्छ आकाश यामुळे तापमानात घट झाली आहे.
उल्हासनगर, कल्याण, ठाणे शहरातही सोमवारी पहाटे सुखद गारवा अनुभवता आला. येथेही १९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जिल्ह्याचे सरासरी तापमान १९ अंश सेल्सियस होते.