गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान मोदींची दिवाळी सैनिकांसोबत – यंदाची दिवाळी कारगिलमध्ये
नवी दिल्ली दि.२४ :- देशाच्या सीमेवर अहोरात्र आपले कर्तव्य बजाविणा-या सैनिकांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचा शिरस्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षीही कायम राखला आहे. पंतप्रधान मोदी यांनी यंदाची दिवाळी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी केली. कारगिल येथे सैनिकांसह दिवाळी साजरी करण्यासाठी मोदी सोमवारी सकाळी कारगिलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सैनिकांची भेट घेतली. संध्याकाळी आयोजित एका कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत.
मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. २३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने सियाचीनमध्ये सैनिकांसह पहिली दिवाळी साजरी केली.
त्यानंतर ११ नोव्हेंबर २०१५ मध्ये मोदी यांनी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ३० ऑक्टोबर २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे भारत-चीन सीमेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. १८ ऑक्टोबर २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील गुरेझमध्ये, ७ नोव्हेंबर २०१८ मध्ये उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांसह,
२७ ऑक्टोबर २०१९ मध्ये नियंत्रण रेषेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. राजौरी येथे नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. १४ नोव्हेंबर २०२० रोजी मोदी यांनीजैसलमेरमधील लोंगेवाला पोस्ट येथे दिवाळी साजरी केली. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर या दिवशी राजौरीच्या नौशेरा येथे दिवाळी साजरी केली.