मुंबई आसपास संक्षिप्त
रुळ ओलांडताना दीड हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू
मुंबई दि.२४ :- रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागल्याने गेल्या दोन वर्षांत आत्तापर्यंत एक हजार ९६२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३२४ जण जखमी झाले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई आणि उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. प्रवासीही निष्काळजीपणाने जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत आहेत.
नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती
कल्याण- नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या सीएनजी बस मधून सोमवारी सकाळी गॅस गळती झाली. कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅल समोर ही घटना घडली. परिसरातील नागरिक, पादचारी यांनी हा प्रकार बस चालकाच्या निदर्शनास आणून दिला. तातडीने बस थांबविण्यात आली. अग्निशमन दलाकडून ही गळती थांबविण्यात आली. बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२
मुंबई- मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे (एमएमओपीएल) दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धक, कलाकारांना मेट्रो गाडी सजविण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. याबाबतचीच माहिती ‘एमएमओपीए’च्या संकेतस्थळावर मिळू शकेल. २२ डिसेंबर रोजी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार असून २७ डिसेंबरला विजेत्यांच्या चित्रांनी मेट्रो गाड्या सजविण्यात येणार आहेत.
आंतरशालेय किल्ले बांधणी स्पर्धा
डोंबिवली- जाणता राजा युवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे डोंबिवलीत आंतरशालेय किल्ले बांधणी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी मंदिर येथील मोकळ्या मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात रायगड, प्रतापगड, तोरणा, विसापूर,हडसर, पुरंदर, वासोटा, लोहगड आदी विविध १५ किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.
‘सिडको’ कडून घरांसाठीची सोडत जाहीर
नवी मुंबई- सिडकोकडून ७ हजार ८४९ घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामणडोंगरी येथेज्ञ ही घरे उपलब्ध होणार आहेत. मंगळवारपासून घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री सुरू केली जाणार आहे.