मुंबई आसपास संक्षिप्त
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
अंधेरी पोटनिवडणूकीसाठी ५६ मतदान केंद्रे
मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी ५६ मतदान केंद्रे असणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर
मुंबई :– मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (२३ ऑक्टोबर) औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ठाकरे भेट घेणार असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न करणार आहेत .
नेरळ- माथेरान मार्गावर डेमू मिनी ट्रेन
नेरळ-माथेरान मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा डब्यांची डेमू मिनी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्याकडे मध्य रेल्वेने प्रस्ताव पाठविला असून डेमू गाड्यांमुळे रुळावरुन गाडी घसरण्याचा घटनांना आळा बसणार आहे.