एसटी महामंडळाची आजपासून हंगामी भाडेवाढ
मुंबई दि.२१ :- एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ आज २१ ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. ही भाडेवाढ दहा टक्के असून ती ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), ‘शिवशाही’ (आसन) आणि शयन आसनी बसगाड्यांना लागू आहे. ‘शिवनेरी’ आणि ‘अश्वमेध’ या बसगाड्यांना यातून वगळण्यात आले आहे.
हेही वाचा :- नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू
या भाडेवाढीमुळे दादर-स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या साध्या बसचे भाडे २३५ रुपयांवरून २६० रुपये, तर शिवशाहीचे भाडे ३५० रुपयांवरून ३८५ रुपये होईल. मुंबई-औरंगाबाद दरम्यान साध्या बसने प्रवास करण्यासाठी ८६० रुपयांऐवजी ९५० रुपये भाडे मोजावे लागेल. तसेच ‘शिवशाही’च्या भाड्यात १३० रुपयांनी वाढ करण्यात आली असून ‘शिवशाही’चे भाडे १,२८० रुपयांवरून १,४१० रुपये झाले आहे.
हेही वाचा :- जागतिक नेमबाजी स्पर्धा – सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान तिकीट दरातील तफावतीची रक्कम वाहकाकडून वसूल केली जाणार आहे. ही भाडेवाढ एसटीच्या ‘आवडेल तिथे प्रवास’, तसेच मासिक आणि त्रैमासिक, विद्यार्थी पाससाठी लागू नाही.