कडोंमपा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करा.. – शेखर जोशी
डोंबिवली दि.२० :- येथील नागरी सोयी- सुविधांचा झालेला बट्ट्याबोळ, ढिम् महापालिका प्रशासन आणि निद्रिस्त सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांना जाग आणण्यासाठी गुरुवारी (२० ऑक्टोबर २०२२) डोंबिवलीत दिवे बंद आंदोलन तसेच घंटानाद/थाळीनाद केला जाणार आहे. आंदोलनाचे पुढील टप्पे वेळोवेळी जाहीर केले जाणार आहेत. समाज माध्यमांतून गेल्या काही दिवसांपासून याविषयी चर्चा होत आहे, पोस्ट फिरत आहेत.
हेही वाचा :-डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे
‘एमआयडीसीती’ल काही नागरिकांनी तसेच दक्ष नागरिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे पंतप्रधान मोदी यांना लेखी/छापील पत्र किंवा ई मेल करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. हे दोन्ही उपक्रम नक्कीच चांगले आहेत. सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन या विरोधात योग्य पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहे, संबंधितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे
यापुढे जाऊन मला असे वाटते की आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आपण सर्वांनी या सगळ्याचा निषेध म्हणून ‘नोटाचा’ वापर केला पाहिजे. यामुळे काय फरक पडणार आहे? त्याने काय होणार आहे? असे प्रश्न अनेक जण विचारतील. पण आपण सर्वांनी एकत्र येऊन एक चळवळ म्हणून कडोंमपा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर केला आणि या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले तर कोडग्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना त्याची नक्कीच दखल घ्यावी लागेल. काहीतरी हालचाल नक्कीच होईल. आणि निवडणुकीतील उमेदवारापेक्षा ‘नोटा’ची मते जास्त झाली (किमान एक/दोन प्रभागात) तर ती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना, राजकीय पक्षांना मोठीच चपराक असेल. ती ऐतिहासिक घटना ठरेल.
हेही वाचा :- मुंबईतून सुमारे तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
डोंबिवलीत अनेक सोयी- सुविधांचा अभाव आणि इतर अनेक नागरी समस्या आहेत. प्रत्येकाने आपण कोणत्या समस्येच्या निषेधार्थ ‘नोटा’चा वापर करणार आहोत हे जाहीर करावे. बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूटमार, रिक्षामीटर सक्तीची न झालेली अंमलबजावणी, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुठभर बेशिस्त रिक्षाचालक तसेच रिक्षाचालक-मालक संघटनापुढे टाकलेली नांगी याच्या निषेधार्थ आगामी कडोंमपा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करणार आहे.
हेही वाचा :- अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
अडीच/तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मी हे जाहीरही केले होते.आणि ही व्यापक जनचळवळ/जनआंदोलन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. दरम्यान करोना आला आणि निवडणूक झालीच नाही, पुढे ढकलली गेली. तेव्हा आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीत बदल झाला असला तरी डोंबिवलीतील बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक यांच्याकडून प्रवाशांची होणारी लूटणार,अद्यापही न झालेली रिक्षा मीटरसक्ती, रेल्वे स्थानक परिसराला बेशिस्त रिक्षाचालकांचा पडलेला विळखा हे प्रश्न कायमच आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा लोकप्रतिनिधीने या विषयावर सर्वसामान्य प्रवाशांची बाजू घेऊन हे प्रश्न धसास लावलेले नाहीत. प्रसारमाध्यमातून याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या की काहीतरी केल्याचे ‘नाटक’ केले जाते मात्र परिस्थितीत काहीही बदल होत नाही. समाज माध्यमांतून, ई मेलद्वारे स्थानिक आमदार, खासदार, ठाणे जिल्हा पालकमंत्री (रवींद्र चव्हाण, डॉ. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे) यांचे वेळोवेळी लक्ष वेधून घेण्याचा वैयक्तिक प्रयत्न केला. ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या माध्यमातून या प्रश्नावर वेळोवेळी बातम्याही दिल्या. पण काहीही बदल झाला नाही.
हेही वाचा :- संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीत पुन्हा अवतरणार!
वरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला पुन्हा एकदा या सगळ्याची आठवण झाली. येत्या काही महिन्यांत कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. रिक्षा प्रश्नाचा निषेध म्हणून आगामी कडोंमपा निवडणुकीत मी’नोटा’चा वापर करणार आहे, असे पुन्हा जाहीर करतो. ‘नोटा’ जनआंदोलन व्हावे अशी अपेक्षा.