ठळक बातम्या

यंदा ९ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम?

– २४ ऑक्टोबरला सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश
– स्वाती नक्षत्रापर्यंत पाऊस राहण्याची पूर्वापार समजूत
– उंदीर, गाढव वाहन असेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस

(शेखर जोशी)

पारंपारिक आडाखे आणि भारतीय पंचांगानुसार सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस राहतो.‌ चित्रा आणि स्वाती नक्षत्रांत माघारीचा पाऊस पडू शकतो, अशी पूर्वापार समजूत आहे.‌ यंदाच्या वर्षी येत्या २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी परतल्याचे हवामान खात्याकडूनही अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

मृग ते हस्त ही नक्षत्रे पावसाची नक्षत्रे म्हणून ओळखली जातात.‌ सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला की पावसाला सुरुवात होते असे मानले जाते. यंदाच्या वर्षी ८ जून या दिवशी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला.‌ सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस राहतो अशी पारंपारिक समजूत आहे.‌ पर्जन्य नक्षत्रे आणि त्याचे वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याची पूर्वापार प्रथा आपल्याकडे आहे. हत्ती, मोर घोडा, उंदीर, कोल्हा, म्हैस, बेडुक, मेंढा, गाढव ही पावसाच्या नक्षत्रांची वाहने आहेत.‌

बेडूक, म्हैस, हत्ती हे वाहन असेल तर भरपूर पाऊस पडतो. मोर, गाढव आणि उंदीर हे वाहन असेल तर मध्यम स्वरूपाचा (यंदा १० ऑक्टोबर या दिवशी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश झाला असून वाहन उंदीर आहे आणि येत्या २४ ऑक्टोबर रोजी सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार असून वाहन गाढव आहे.)

आणि कोल्हा, मेंढा वाहन असेल तर पाऊस ओढ लावतो. घोडा वाहन असेल तर पर्वत क्षेत्रात पाऊस पडतो, अशी समजूत आहे. पावसाची नक्षत्रे आणि त्यात पडणाऱ्या पावसाविषयी, मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेच्या आधी पळावे, पडता हस्ती कोसळतील भिंती, पडतील स्वाती तर पिकतील मोती, न पडे उत्तरा, तर भात न मिळे पितरा, पडतील चित्रा तर खाणार नाही कुत्रा अशा काही मराठी म्हणीही प्रचलित आहेत.‌

इंग्रजी कालखंडानुसार जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळ्याचे मानले गेले असले तरी परंपरा आणि पंचांगानुसार मृग ते हस्त नक्षत्रापर्यंत पाऊस पडतो. यंदा २४ ऑक्टोबर या दिवशी सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश होत असून त्यापुढे पंधरा दिवस हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अर्थात पर्जन्य नक्षत्रे, त्याची वाहने आणि त्यावरून पडणाऱ्या पावसाच्या अंदाजाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मात्र वर्षानुवर्षे पूर्वापार चालत आलेल्या आडाख्यांनुसार सर्वसामान्य माणूस, शेतकरी पावसाविषयी आपले आडाखे बांधत असतो.

यंदाच्या वर्षी २२ जून सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश झाला आणि वाहन मेंढा होते. ६ जुलै रोजी सूर्याने पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आणि वाहन उंदीर होते.‌ २० जुलै या दिवशी सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश आणि वाहन कोल्हा हे होते. ३ ऑगस्ट रोजी सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात झाला आणि प्रवेश वाहन मोर होते.‌ १७ ऑगस्ट या दिवशी सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश झाला व वाहन घोडा होते.‌ ३० ऑगस्ट रोजी सूर्याचा पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश वाहन मेंढा तर
१३ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश आणि वाहन गाढव होते.‌ २७ सप्टेंबर रोजी सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झाला, वाहन कोल्हा होते.‌ १० ऑक्टोबर या दिवशी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश झाला असून वाहन उंदीर आहे. येत्या २४ ऑक्टोबरला सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार असून वाहन गाढव आहे. पारंपारिक आडाख्यानुसार उंदीर आणि गाढव वाहन असेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.vv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *