दुत्ववादी संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात व्यापक जनआंदोलन
हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे चेतावणी
म विजय
ठाणे – नालासोपारा येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना ९ ऑगस्टच्या रात्री आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्या निवासस्थानी काही स्फोटके सापडल्याचे म्हटले आहे. श्री. वैभव राऊत यांच्यासह श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि श्री. शरद कळसकर यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, मुसलमान नेते आदींकडून केली जात आहे. काही माध्यमांकडून सनसनाटी आणि दिशाभूल करणार्या बातम्या प्रसारित करून ‘हिंदु आतंकवादा’चा ढोल बडवला जात आहे. असाच (हिंदूंना अडकवण्याचा) प्रकार वर्ष 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळी घडला होता. एकूणच हे मोठे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे येथे समितीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी देण्यात आली.
येथील जांभळी नाक येथील चिंतामणी ज्वेलर्स जवळ हिंदुशक्ती वहिनी, बजरंग दल, श्रीराम हिंदूसेना, शिवप्रतिष्ठान हिदुंस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वारकरी संघटना , सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आज 5 ते 7 या वेळेत राष्ट्रीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांत अटक करून 9 वर्षे तुरुंगात अडकवण्यात आले. नंतर ठोस पुरावा नसल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) स्पष्ट केल्यावर त्या सर्वांना जामीन मिळाला. इतकेच नव्हे, तर कर्नल पुरोहित यांच्या घरी आर्.डी.एक्स.चा साठा सापडल्याचा आरोप करण्यात आला होता; पण कालांतराने हा साठा आतंकवादविरोधी पथकातीलच एकाने कर्नल पुरोहित यांच्या घरी ठेवल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या तपासामध्ये उघड झाले होते. हीच गोष्ट श्री. वैभव राऊत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात झाली असण्याची दाट शंका आहे; कारण श्री. राऊत यांच्या अटकेच्या वेळी मिळालेल्या तथाकथित साहित्याचा पंचनामाच करण्यात आलेला नाही. नालासोपारा येथील ९ हजारांहून अधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन या पोलिसी कारवाईच्या विरोधात १७ ऑगस्ट या दिवशी मोठे जनआक्रोश आंदोलन केले आहे. तसेच या प्रकरणी ताब्यात घेतल्या गेलेल्या पंढरपूर येथील श्री. अवधूत पैठणकर आणि श्री. प्रसाद देशपांडे या दोघांवर खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसच्या अधिकार्यांनी त्यांना प्रचंड बेदम मारहाण केल्याचे उघड झाले आहे. यातून एक मोठे षड्यंत्र चालू असल्याचा दाट संशय येत आहे.
*समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृती करणार्या सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव शासनाने फेटावाळा – सनातन प्रवक्ता*
सनातन संस्था आणि तिचे साधक गेली २ दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. तत्कालीन काँग्रेस शासनाने यापूर्वी वर्ष २०११ मध्ये सनातनवर बंदी घालण्याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता; पण त्याच वेळी सनातनवर बंदी घालण्यासाठी पुराव्याअभावी बंदी घालू शकत नाही, असे सांगून प्रस्ताव फेटाळून लावला होता. याचसमवेत आताच्या केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. किरेन रिजीजू यांनीही सनातन बंदीविषयी माहिती देतांना सांगितले होते की, केंद्र सरकारद्वारे सनातन संस्थेला कायदाद्रोही संघटना असे कोणत्याही प्रकारे घोषित केलेले नाही, तसेच आताच्या स्थितीत केंद्र शासनाकडे सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव आणि विचार नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे चुकीचे आहे. त्यामुळेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याविषयीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. जर अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
*‘एटीसएस्’ कारवाईवर विश्वास तरी कसा ठेवायचा ? – हिंदुत्वनिष्ट*
सर्वांत गंभीर म्हणजे ज्या आतंकवादविरोधी पथकाच्या हवाल्याने अटकसत्र चालू आहे. त्या पथकाविषयी निलंबित पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘वर्ष 2008 च्या मालेगाव बॉबस्फोटातील संशयित हिंदुत्वनिष्ठ संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा यांची आतंकवादविरोधी पथकाच्या (एटीएस्) तत्कालीन अधिकार्यांनी माझ्या डोळ्यांदेखत गोळ्या घालून हत्या केली. 26/11 मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी त्यांचे मृतदेह अज्ञात म्हणून टाकण्यात आले.’’ यानंतर रामजी कलसंग्रा कुटुंबियांनी दिनांक 3 जानेवारी 2018 मध्ये मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कलसंग्रा कुटुंबियांनी असाही आरोप केला आहे की, रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे यांच्याप्रमाणेच दिलीप पाटीदार, दिलीप नहर, धमेंद्र बैरागी यांचीही अशाच प्रकारे गत करण्यात आली आहे. दिलीप पाटीदार प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाल्यावर आतंकवादविरोधी पथकातील अधिकार्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एवढे सर्व असूनही महाराष्ट्र शासनाने आणि आतंकवादविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर अद्यापही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सध्या चालू असलेल्या कारवाईवर किती विश्वास ठेवायचा, हाच मोठा प्रश्न आहे.