13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
12 व्या वरिष्ठ वनाधिका-यांच्या परिषदेचे उदघाटन संपन्न
2016 मध्ये आरंभ झालेली वृक्ष लागवडीची महामोहिम 2017 मध्ये सुध्दा विक्रमी ठरली. आपण ठरविलेले लक्ष्य पुर्ण करत विक्रमी वृक्ष लागवड राज्यात करण्यात आली. हे यश लोकसहभागाचे यश आहेच. त्यासोबतच वन विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांच्या परिश्रमाचा सुध्दा यात सिंहाचा वाटा आहे. यावर्षी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने उत्तम नियोजन करावे आणि पुन्हा एकदा विक्रमाची नोंद करत हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 20 एप्रिल रोजी ठाणे जिल्हयातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे 12 व्या वरिष्ठ वनाधिका-यांच्या परिषदेच्या उद्घाटन समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव ए.के. मिश्रा यांच्यासह वरिष्ठ वनअधिका-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याचप्रमाणे वन विभागाशी संबंधित इतर महत्वपुर्ण विषयांबाबत सुध्दा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावर्षी होणारी 13 कोटी वृक्ष लागवड हे वन विभागाचे मुख्य उद्दिष्ट असून या लक्ष्यपुर्ती साठी प्रत्येकाने स्वत:ला झोकून देत हे ईश्वरीय कार्य पुर्णत्वास न्यावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
यावेळी मेल व्याघ्र, निसर्ग परिचय शिबीर, वेस्टर्न महाराष्ट्र डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना प्रोग्रेस रिपोर्ट 2015 ते 2018 या पुस्तकांसह काटेपुर्णा अभयारण्य या सीडीचे विमोचन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.ही परिषद दोन दिवस चालणार आहे.