मुंबईतल्या १० बार मालकांनी अनिल देशमुखांना तीन महिने ४ कोटी रुपये दिले; ‘ईडी’चा धक्कादायक खुलासा!

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. ईडीच्या या छापेमारीमागचं एक मोठं कारण आता समोर आलं आहे. मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीनं धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीकडून आज सकाळपासून चार विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीयसहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. मुंबईतील बार मालकांकडून अनिल देशमुख यांना रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत आणि याच आधारावर ईडीनं आज छापे टाकले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील १० बार मालकांचे जबाब ईडीनं नोंदवले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. यात पैश्यांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीनंही याप्रकरणात उडी घेतली आहे. यातूनच ईडीच्या काही काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलीसमधून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेनं मुंबईतील बार मालकांकडून दरमहा ४० ते ५० लाख रुपये वसुल केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.