कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना 1 कोटी 56 लाखांचा गंडा.. मे. एस कुमार गोल्ड अँड डायमंड दुकानाचे शटर अचानक बंद

कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना 1 कोटी 56 लाखांचा गंडा.. मे. एस कुमार गोल्ड अँड डायमंड दुकानाचे शटर अचानक बंद

कल्याण पश्चिमेकडील वल्लीपीर रोडला असलेल्या झोझवाला हाऊसमध्ये मे. एस कुमार गोल्ड अँड डायमंडचे शटर अचानक बंद झाल्याने त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पुरते धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत या शोरूमच्या मालक, चालक आणि संचालकांनी २६ गुंतवणूकदारांना तब्बल १ कोटी ५६ लाख ७४ हजार ५३९ रूपयांचा चुना लावल्याच्या तक्रारी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात कल्याण मलंगगड रोडला अमृता पार्क सोसायटीत राहणाऱ्या रोशल कृष्णकांत गावित (३३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 420, 406 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायद्याचे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

१५ ते १८ टक्के व्याजदराने पैसे रिटर्न मिळण्याचे आमिष..या ज्वेलर्स दुकानाचा व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई याने मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच गोल्ड स्किमच्या गुंतवणूकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देत असल्याचे व त्याकरीता त्यांच्याकडे मासिक भिशी योजना, फिक्स डिपॉजीट योजना अशा आकर्षक योजना चालू असल्याचे भासवून त्यावर १५ ते १८ टक्के व्याजदराने पैसे रिटर्न मिळतील अशी जाहीरातबाजी केली.

सन २०१८ ते सन २०२१ पर्यंतच्या कालावधीत मे. एस. कुमार गोल्ड अॅन्ड डायमंड ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई याने रोशल गावित यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये, त्यांची आई क्लाडेट परेरा यांच्याकडून १० हजार रुपये स्विकारुन सोने न देता, तसेच त्यांचे घेतलेले पैसे परत न करता त्यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली.

त्याचप्रमाणे व्यवस्थापकिय संचालक श्रीकुमार पिल्लई याने अन्य ग्राहकांकडून पैसे स्विकारुन त्यांना सोने, डायमंड न देता किंवा घेतलेली रक्कम परताव्यासह परत न करता दुकान बंद करून पळ काढला.

कागदोपत्री पुराव्यांसह पोलिसांकडे अर्ज ..यातील फिर्यादी रोशल गावित आणि त्यांची आई क्लॉडेट परेरा यांची फसवणूक झालेली रक्कम २ लाख ५० हजार रुपये, तसेच इतर २५ तक्रारदारांची मिळून एकूण १ कोटी ५६ लाख ७४ हजार ५३९ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा मे. एस कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्सचा व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई याच्यावर आरोप आहे.

या संदर्भात रोशल गावित यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यांसह पोलिसांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.