भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर, अॅड. विरेंद्र इजलकरंजीकर हिंदूंना संबोधित करणार, समस्त हिंदु बांधवांनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे ! – हिंदु जनजागृती सामितीचे आवाहन
(जय दूबे)
भिवंडी – हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना संघटित करणे आणि हिंदु धर्म अन् हिंदू धर्मिय यांच्यावर होणारा अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना कृतीप्रवण करणे या व्यापक उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ जानेवारी २०१८ या दिवशी सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदानावर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार श्री. राजासिंह ठाकूर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर, सनातनच्या सौ. नयना भगत,हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके, रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर या हिंदूंना संबोधित करणार आहेत. या सभेचा प्रचार आणि प्रसार अंतिम टप्प्यात आला असून सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेच्या प्रचारासाठी भिवंडी तालुक्यात आतापर्यंत ७० गावांमध्ये ३५० बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच शहर आणि ग्रामीण भागांत ७४ फलक लिखाणाद्वारे निमंत्रण देण्यात आले. तसेच ५१ होर्डिंग लावण्यात आले आहेत. १२५०० हस्तपत्रके वितरीत करण्यात आली असून ठिकठिकाणी रिक्शाद्वारे उद्घोषणा करून समस्त हिंदु बांधवांना सभेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासह ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सअॅप’ आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे लाखो लोकांपर्यंत सभेचा उद्देश पोचवला गेला आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे लोकप्रतिनिधी, यांसह समस्त हिंदुप्रेमींना या सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यासह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना या धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.