८ नोव्हेंबर हा लोकशाहीतील काळा दिवस

(पुजा उगले )
नोटाबंदीच्या निर्णयावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ हा भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस होता, असे ते म्हणाले.
अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरपारची लढाई सुरू झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरून विविध स्तरांतून सरकारवर टीका होत असताना नोटाबंदी ही सरकारची घोडचूक होती, असे अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल म्हटले होते. अहमदाबादमध्ये आज पुन्हा त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. ८ नोव्हेंबर हा अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के रोकड एकाच वेळी परत घेण्यात आली. आतापर्यंत जगातील कोणत्याच देशाने असा निर्णय घेतला नाही. रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.
नोटाबंदीमुळे लोकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे, असे मी संसदेत म्हणालो होतो. त्याचा पुनरुच्चार आजही करत आहे. सरकारने एकप्रकारे ‘टॅक्स टेररिझम’ लागू केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसले आहेत. यामुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले, असा प्रहारही त्यांनी केला. मनमोहनसिंग यांनी मोदींवरही निशाणा साधला. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय लोकांवर लादला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली तेव्हा मला धक्काच बसला, असेही ते म्हणाले. नोटाबंदी आणि जीडीपीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशविरोधी ठरवले जाते. नोटाबंदी ही एक प्रकारची संघटीत लूट होती, असा आरोपही त्यांनी केला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email