५ ऑगस्टला जिल्ह्यात मोठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १ लाख ८५ हजार बालकांना लस देणार

(श्रीराम कांदु)

ठाणे दि २५ – जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असून यामध्ये १ लाख ८५ हजार ६०० बालकांना लस देण्यात येईल. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

ग्रामीण भागात १ लाख २२ हजार ६३६ तर शहरी भागात ६२ हजार ९६४ बालकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ जळगावकर यांनी सांगितले. यासाठी १४०७ बुथ्स असून ४६६ मोबाईल पथके व ११९ ट्रान्झीट पथके असतील. सुमारे ३५०० कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. अंबरनाथ, भिवंडी, कल्याणन, मुरबाड या ४ तालुक्यात व ६ पालिका क्षेत्रांत ही मोहीम राबविण्यात येईल.

या मोहिमेसाठी जिल्हा स्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरांवर आशा कार्यकर्ता तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी ,स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण होत आहे.

११ मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत १०५ टक्के म्हणजे उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले होते असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रेंगे यांनी सांगितले.

देशात जानेवारी २०११ नंतर अद्यापपर्यंत पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र रोगाचा उद्भव होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे जिल्ह्यात ४ तालुक्यात व ६ पालिका क्षेत्रांत ० ते ५ वयोगटातील बालकांना लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेचा सूक्ष्म आराखडा व्यवस्थित तयार करण्यात येऊन त्यातील अडचणींवर मात करावी व मोहीम यशस्वी करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी देखील महत्वपूर्ण सुचना दिल्या. बैठकीस उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी तसेच पालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email