३१ लाखांचा गुटखा जप्त; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी
बीड – गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गेवराई तालुक्यात कारवाई करत बुधवारी ३० लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त केला आणि एकास ताब्यात घेतले. हैद्राबाद येथून औरंगाबादकडे एका टेम्पोद्वारे गुटखा जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या पथकाला झाल्यानंतर पहाटेच्या दरम्यान या पथकाने पाडळसिंगीजवळील एकलिंगेश्वर पेट्रोलपंपासमोर टेम्पो (एम.एच. ०३ सी.टी. ५३१८) अडवून तो ताब्यात घेतला. या टेम्पोत ४१ पोत्यातून जवळपास ३० लाख ७५ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी सुरेश वाघमारे (रा. मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख कैलास लहाने, पो.कॉ. प्रल्हाद चव्हाण, देशमुख, गणेश जगताप, संजय चव्हाण, तुळजीराम जगताप, विजय पवार, जयराम उबे यांनी केली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल गेवराई ठाण्यात जमा करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.