२२ कुटुंबीयांना दोन महिन्याचे वीज बिल ५० हजार रुपये ….
( श्रीराम कांदु )
तीन महिन्यांपूर्वी डोंबिवली येथील धोकादायक नागुबाई सदन ही इमारत खचली. या इमारतील २२ कुटुंबांचे कल्याण येथील कचोरे ‘बीएसयूपी’ प्रकल्पात तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. दरम्यान महावितरणकडून या रहिवास्याना दोन महिन्याचे बिल तब्बल ५० हजार रुपये पाठवले आहे. प्रत्येक रहिवास्यांच्या घरात केवळ दोन विजेचे दिवे असून धक्कादायक बाब म्हणजे या बिलांवर मीटर रीडिंग शून्य आहे. मात्र दोन बल्बचे ५० हजार बिल पाहून रहिवास्यांना धक्का बसला आहे याबाबत रहिवाशांनी महावितरण अधीकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी सदर बिले जमा करून घेण्यात आली. मात्र अद्याप सुधारीत बिले दिलेली नसल्याने आता बिले भरायची तरी कशी असा सवाल नागरिकांसमोर उभा ठाकला असून महावितरणच्या विजेच्या कडाक्याच्या झटक्याने नागरिक ऐन थंडीत वीज बिल पाहून त्यांना भीतीने घाम फुटला आहे .
महावितरणचा सावळा गोंधळ सुरू असून यूनिट वापर आणि प्रत्यक्षात येणारे बिल यामध्ये प्रचंड तफावत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोंबिवली पश्चिमे कडील नागूबाईसदन या धोकादायक इमारत खचल्या नंतर या इमारती मधील रहिवाशाना पालिकेच्या कल्याणातील कचोरे येथील बीएसयूपी इमारत क्रमांक १ व ७ मध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. या इमारतीतील २२ कुटुंबीय गेल्या दीड महिन्यापासून राहत असून या दोन इमारतीला महावितरणने केवळ दोन मीटर लावले असून त्यांना तब्बल पन्नास हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे .कल्याणमधील कचोरे परिसरात महावितरणने रीडिंग न घेताच बिले धाडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर महिन्यात राजेश वाघमारे या ग्राहकाला ५०० रूपये बिल आले असताना जानेवारी महिन्यात तब्बल चार हजार बिल आले आहे. अवाच्या सवा बिल आलेल्या या परिसरातुन ४९ तक्रारी महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या दिली. महावितरणचे वसुली कर्मचारी मात्र आधी बिले भरा पुढच्या बिलात वाढीव रक्कम कमी होईल असे सांगून सक्तीने बिले वसूल केली जात आहेत. बिल नाही भरले तर विज जोडणी तोडण्याची तंबी दिली जात असल्याने येथील कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत.