होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी उपक्रम ; आपला आधार फाउंडेशनतर्फे होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी वाटप
पनवेल – होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना आपला आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेल्यावर्षीपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर गरिबांना व गरजूंना पुरणपोळीचे वाटप केले गेले. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच आपला आधार फाउंडेशनतर्फे पुरणपोळीचे वाटप करण्यात आले. या पुरणपोळी वाटप कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक आप्पा दळवी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुरणपोळी वाटप कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.