होम प्लॅटफॉर्मच्या 15 फेब्रुवारीला निविदा, पादचारी पुलालाही मान्यता : खासदार कपिल पाटील यांची माहिती
(म.विजय)
बदलापूर व आसनगाव स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी येत्या 15 फेब्रुवारी रोजी निविदा काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दोन्ही स्थानकात दोन नवे पादचारी पूल उभारण्यात येतील, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली. होम प्लॅटफॉर्ममुळे दोन्ही रेल्वेस्थानकातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
बदलापूर व आसनगाव शहरांची लोकसंख्या वाढत आहे. या भागात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासासाठी एकमेव स्वस्त पर्याय हा रेल्वे आहे. मात्र, या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. ती लक्षात घेऊन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्म तयार करण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पाहणी केली होती. तर आसनगावलाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर रेल्वेने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासनाने होम प्लॅटफॉर्मला हिरवा कंदील दाखविला होता.या संदर्भात खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. तसेच दोन्ही स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम वेगाने करण्याची मागणी केली होती. त्यावेळी होम प्लॅटफॉर्मच्या निविदा 15 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासनही खासदार पाटील यांना देण्यात आले. या प्लॅटफॉर्मसाठी जागतिक बॅंकेकडून निधी दिला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते एप्रिलमध्ये केले जाणार आहे.बदलापूर व आसनगावमध्ये अरुंद पादचारी पुलामुळे प्रवाशांना तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे या ठिकाणी नवे पादचारी पूल उभारण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली. त्यालाही रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली. मात्र, या ठिकाणी केवळ दोन मार्ग असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल रखडतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकलसाठी स्वतंत्र मार्ग उभारावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. या संदर्भात आगामी रेल्वे अर्थसंकल्पात विचार करण्याचे आश्वासन पियूष गोयल यांनी दिले आहे.