‘हेच का अच्छे दिन’ सरकारमधील सामील शिवसेनेची ठिकठिकाणी पोष्टरबाजी
मुंबई – मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
मात्र गल्ली ते दिल्ली भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेने ‘हेच काय अच्छे दिन?’ अशी पोस्टरबाजी करून वाढत्या महागाई पासून स्वतःला वेगळं भासवत असल्याची चर्चा मुंबईमध्ये रंगली आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वच थरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. परंतु आम्ही केंद्रात सुद्धा भाजपबरोबर सामील आहोत याचा शिवसेनेला विसर पडल्याचे या पोश्टरबाजीतून दिसत आहे.
शहरातील इतर भागात तसेच दादर येथील शिवसेना भवनच्या समोर इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने बॅनर लावले असून यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या २०१५ च्या आणि २०१८ च्या किंमतीतील फरक दाखवला आहे. ‘हेच का अच्छे दिन’?, असं म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या मनात सरकारबद्दल रोष वाढत असून, त्या रोषातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःला वेगळं भासविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.