हुक्का पार्लर वाद ! हत्याप्रकरणी दोघा मारेकऱ्यांना पोलीस कोठडी

(श्रीराम कांदु)

– प्रस्तावित हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्या गाड्यांना मज्जाव करणाऱ्या रियाज उर्फ मेंटल शब्बीर अहमद शेख (३३) याची हत्या करण्यात आली होती. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी दोघा मारेकऱ्यांच्या अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या आहेत. या दोन्ही मारेकऱ्यांना कल्याणच्या सुट्टी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या हत्याकांडात आणखी ३ मारेकऱ्यांच्या समावेश आहे. ते फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. एकीकडे घटनास्थळी सापडलेल्या एका जिवंत काडतुसामुळे या हत्याकांडादरम्यान गोळीबार झाला की नाही, याबाबत डॉक्टरांसह पोलिसही संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे मृत रियाज उर्फ मेंटलच्या शरीराचा एक भाग तांत्रिक तपासणीकरिता मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.साजिद हमीद सय्यद (३०, रा. दातवालीची चाळ) आणि इरफान उर्फ छोटू जमालूद्दीन शेख (२२, रा. मलिक चाळ) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. हे दोघेही कल्याण पूर्वेतील श्रीकृष्ण नगरमध्ये राहत आहेत. या दोघांना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील साजिद सय्यद हा रिक्षा चालवितो. तर इरफान उर्फ छोटू शेख पीओपीचे काम करतो.

सशस्त्र हल्ल्यात ठार झालेला रियाज उर्फ मेंटल राहत असलेल्या कचोरे गाव (नवीन गोविंदवाडी) येथील शर्मा चाळीच्या समोरच्या इमारतीत साजिद सय्यद हा हुक्का पार्लर सुरू करणार होता. वातानुकूलीत पार्लरमध्ये रंगकाम सुरू होते. पोलिसांच्या मते या ठिकाणी हॉटेल सुरू करण्यात येणार होते. मात्र हुक्का ठोकण्यासाठी येणाऱ्यांची या ठिकाणी वर्दळ सुरू झाली होती. त्याचबरोबर गाड्यांचे पार्कींगदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागले. हॉटेल वजा हुक्का पार्लर सुरू झाल्यानंतर हुक्केबाजांचा आणखी त्रास वाढणार होता. हे ओळखून रियाज उर्फ मेंटल शेख याने त्याला कडाडून विरोध सुरू केला. शुक्रवारी रियाज आणि साजिद या दोघांत शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या. अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला.

पोलिसांनी या दोघांवर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडणार असल्याची लेखी ग्वाही पोलिसांना दिली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. रियाजची पत्नी निलोफर (वय-३०) ही आपल्या पतीच्या हत्याकांडाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. घटनास्थळी घराच्या गॅलरीमध्ये उभी असताना घराकडे परतणाऱ्या रियाज याला शाहरूख रफीक बंगाली, जिवादादा आणि पापा पठाण या दोघांनी जखडून ठेवले. तर साजिद आणि इरफान उर्फ छोटू यांनी आपल्या पतीवर सशस्त्र हल्ला चढविला. साजिद याने त्याच्याकडील कट्ट्याने रियाजवर गोळ्या झाडल्याचा आरोप निलोफरन तक्रारीत केला आहे.

मृत रियाजच्या कपाळाचा भाग तपासणीकरता रवाना 

पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमूने, एक जिवंत कडतूस, रक्ताने माखलेला सुरा हस्तगत केला आहे. मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचा आरोप रियाजच्या नातेवाईकांनी केला आहे. तर मारेकऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला. रियाजने केलेल्या हल्ल्यात इरफान उर्फ छोटू याच्या डाव्या हाताला जखम झाली. तर दुसरीकडे रियाजच्या मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली असता त्याच्या शरीरात गोळी घुसल्याचे डॉक्टरांनी नाकारले. मात्र गोळी कपाळाला घासून गेल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याच्या कपाळाचा काही भाग तांत्रिक तपासणीकरता मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.

मृत रियाज उर्फ मेंटल कुख्यात गुन्हेगार : 

सशस्त्र हल्ल्यात ठार झालेला रियाज शेख हा मेंटल नावानेही ओळखला जायचा. त्याच्या नावावर कल्याणचे बाजारपेठ पोलीस ठाणे, उल्हासनगरचे हिललाईन पोलीस ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. पादचारी, विशेषतः महिलांच्या गळ्यातील दागिने लुटण्यात हातखंडा असलेला रियाज सद्या जामिनावर मुक्त होता. हल्ल्याच्या वेळी त्यानेही शस्त्र बाळगले असल्याची जबानी आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव धुमाळ यांनी दिली. रियाजने वार केल्यामुळे इरफान उर्फ छोटू हा जखमी झाल्याचेही ते म्हणाले. या घटनेची आम्ही सखोल चौकशी सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षख धुमाळ म्हणाले.


ड्रग्ज माफियांची खैर नाही 

दहशतवादाप्रमाणे नशादेखील आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. देशाची भावी पीढी नशेच्या अंमलाखाली जात असेल तर या नशेचा व्यापार करणाऱ्यांची पोलीस कधीही गय करणार नाही. पोलीस, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि एनजीओ एकत्र आले तरच ड्रॅगला दूर ठेवता येईल. अंमली पदार्थांची तस्करी, व्यापार करणारे गुन्हेगार सातत्याने जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांना पकडण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही अशा गुन्हेगारांची पोलीस कधीही खैर करणार नाहीत. पोलिसांकडून हुक्का पार्लरसारख्या कोणत्याही धंद्याला परवानगी देत नाही. त्यामुळे प्रस्तुत ठिकाणी हुक्का पार्लर होता, हा आरोप निरर्थक असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त, रविंद्र वाडेकर यांनी सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email