हा माझा नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांचा सन्मान – शिवसेना नेते एकनाथ शिंदे

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणारे आणि नुकतेच शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना ठाणे व शिवसेना कल्याण लोकसभा तर्फे दिमाखदार सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘एक सामान्य कार्यकर्त्यापासून आज नेतेपदी काम करण्याची संधी मिळाली. हा सन्मान दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो. हा माझा नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांचा सन्मान आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आंदोलनात नेतृत्व करुन मी आरोपी नंबर एक आहे. कारण प्रत्येक आंदोलन मी आदेश देऊन न थांबता शिवसैनिकांबरोबर असतो.’

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘शिवसेना ही चार अक्षरे आणि बाळासाहेब या नावाची ही मोठी ताकद आहे. त्यामुळे कोणत्याही पदाची अपेक्षा मला नव्हती. सगळी पदे मिळाली, ती सर्व निष्ठेने सांभाळली. त्यात घरच्यांनी कायम हसत हसत परवानगी दिली. ऊर्जा आणि प्रेरणा शिवसैनिकांमुळेच आहे. शिवसैनिकांच्या त्याग आणि कष्टामुळेच जिल्ह्यात यश मिळत भगावा डौलाने फडकत आहे. पदाचा वापर अडल्यानडल्या, सामान्य माणसाच्या उपयोगी पडण्यासाठी असतो तो मी करत राहणार आणि असेच कार्यकर्ते, शिवसैनिक घडले पाहिजेत, ते मी घडवत राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. निवडणुका जिंकण्यासाठी आदेशांची गरज नसते त्यासाठी जीव ओतून काम करावे लागते, तेव्हा यश मिळते. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी आपण त्यासाठी लक्ष ठेवत असतो. लोकांच्या समस्या आणि कामांसाठी झटले पाहिजे. लोकांची कामे केली जातात तेव्हाच शिवसेनेला यश मिळते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जादू झाली आणि शिवसेनेला सत्ता मिळाली ती केवळ काम, मेहनतीचे फळ आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी खांद्यावर हात टाकून कुटूंबासह समाजही तुझी जबाबदारी असल्याचे कठिण प्रसंगी सांगितले. तेव्हापासून आज नेतेपदापर्यंत घडलो ते केवळ शिवसेना या चार शब्दांमुळेच. धर्मवीर दिघे यांचे स्वप्न जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्याचे आता पूर्ण झाले. याची किमया फक्त शिवसैनिकांच्या कष्ट व मेहनतीची आहे. या सत्कारप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने, प्रा. राम शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, गजानन कीर्तिकर, रवींद्र चव्हाण, नितीन बानगुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिवारी सायंकाळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतर्फे कल्याण-शीळ रस्त्यावरील प्रीमियर मैदानावर पार पडला. सामान्य शिवसैनिकापासून सुरु झालेली शिंदे यांची राजकीय कारकीर्द आज शिवसेनेच्या नेतेपदापर्यंत पोहोचली आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृहनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री आणि आता शिवसेना नेता अशी उत्तरोत्तर प्रगती करत असतानाच धर्मवीर आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे सांभाळत त्यांनी शिवसेनेचे ठाणे हे समीकरण अधिक घट्ट करण्याची कामगिरी बजावली. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात यंदा प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर गतवर्षी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत देखील शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता प्राप्त झाली.

जिल्ह्यातील अनेक विकासकामांना दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले. क्लस्टर डेव्हलपमेंट, एसआरए, मेट्रो, रस्त्यांचे भक्कम जाळे, पाणीपुरवठा अशा अनेक विकास प्रकल्पांना  शिंदे यांनी गती दिली. त्यांच्या या कामगिरीची दखल पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी घेऊन त्यांची नुकतीच नेतेपदी निवड केली. ठाणे जिल्ह्याला मिळालेला हा बहुमान हा शिवसैनिकांचाच सन्मान आहे, या भावनेने एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी नितीन बानुगडे पाटील म्हणाले, संघर्षातून निर्माणा झालेल नेतृत्व हे चिरकाल टिकणार असते. देण्यातच आनंद आहे हा दिघेसाहेबांनी दिलेला मंत्र जपणारा जनसामान्यांचा नेता म्हणजे एकनाथ शिंदे हे आहेत.

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, युतीच्या संपूर्ण प्रवासात आनंद दिघे साहेबांची उणीव भासू न देता प्रचंड आत्मविश्वाने संघर्षातून ठाणे जिल्ह्याला विकासाकडे नेणारा व आपल्या संघटनेवर व शिवसैनिकांवर प्रेम करणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे असून त्यांना उत्तरोत्तर यापेक्षाही मोठी पदे मिळोत, अशा शब्दांत राज्यमंत्री चव्हाण यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, ठाण्याच्या किसननगर शाखाप्रमुख ते शिवसेना नेता हा पल्ला गाठणारा जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आसणारा दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे आहे. मंत्री कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे आहेत, अशा शब्दांत खा. किर्तीकर यांनी गौरव केला.

कॅबिनेट मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारला सळो की पळो करून सोडणारा एकमेव आघाडीवर असणारा आमदार म्हणजे एकनाथ शिंदे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारा व सर्वात लोकाभिमुख नेता. खऱ्या अर्थान सेना-भाजप युतीतील दुवा म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आपल्या भाषणात म्हणाले, लोक अशाच माणसावर प्रेम करतात जो निस्सीम प्रेम करुन त्यांच्या कामी येतो. असा लोकमान्यता व समाज मान्यता असलेला दुर्निळ योग असलेला नेता म्हणून मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासारखे उच्च शिक्षित राजकारणात आल्याने भारताचे भवितव्य उज्वल आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, भव्य नागरी सत्कार म्हणजे काय याची प्रचीती आज आली. सातत्याने सर्वसामान्य माणसात रमणारा असा दुर्मिळ गुण असणारा माणूस जिद्दीने दुसऱ्यांना मोठा करणारा नेता झाला, हेच ठाणे जिल्ह्याचे भाग्य असल्याचे मत व्यक्त केले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email