स्वच्छता करतानाच कळेल स्वच्छता राखण्याचे महत्व : श्रीपाद नाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा भाग काल सुरु होत असून गांधी जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे. पंतप्रधानांसह देशभरात हे अभियान सुरु झाले आहे. प्रत्येक खासदार, कार्यकर्ते, नागरिक गाव-शहरांमध्ये सफाई अभियान राबवतील. या अभियानाच्या निमित्ताने कचरा वेचताना आपल्या लक्षात येईल की कचरा करणे बंद केले तरी अर्ध्याहून अधिक भारत आपोआपच स्वच्छ होईल, अशी भावना केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज म्हार्दोळ येथे व्यक्त केली.

१५ सप्टेंबर अर्थात सेवा दिनानिमित्त श्रीपाद नाईक यांनी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्यांनी केलेला कचरा जेव्हा आपण उचलतो तेव्हा मी देखील कचरा केला नाही पाहिजे, अशी शिकवण आपल्याला मिळते. आरोग्याबाबतही आपल्याला जागरूक राहायला हवे; प्रदूषण, नैसर्गिक गोष्टींचा ऱ्हास आजूबाजूला होत असताना आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेण्याची गरज आहे; ही जाणीव लोकांमध्ये यावी यासाठी पंतप्रधानांचा प्रयत्न आहे, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.

याप्रकारच्या कार्यक्रमांमुळे लोकांमध्ये स्वच्छतेबाबत उत्साह दिसून येत आहे. लोकांनी स्वेच्छेने जे काम केले आहे, त्याबद्दल देशभरातील लोकांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असे मला वाटते, अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली. इतरही नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नाईक यांनी केले.

यावेळी म्हार्दोळ, प्रियोळचे पंच सदस्य उपस्थित होते. प्रियोळ मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गावडे, माजी अध्यक्ष गजानन प्रभुगांवकर, उत्तर गोवा जिल्हा पदाधिकारी सतीश मडकईकर, माजी सरपंच व विद्यमान पंच मंगलदास गावडे, गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषद अध्यक्ष उर्वेश रेडकर, वज्रकांत नाईक, सुहास नाईक, शिवनाथ नाईक, महेश सतरकर, प्रज्योत प्रभुगांवकर, देनू नाईक, भिकू नाईक व इतर कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. यांसोबतच संदिप नाईक, मयुरेश नाईक, सानिशा नाईक ही लहान मुले देखील उत्साहाने सहभागी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.