स्वच्छता अॅपवर तक्रारीचे निवारण होईना …. नागरिक नाराज
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुंपले आहे. मात्र स्वच्छता अॅपवर तक्रारी करूनही निवारण वेळावर होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी नागरिकांना आवाहन करत असले तरी लवकरच नागरिकांचा या अॅपवरील विश्वास उडाल्याचे दिसते.
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील २५ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे टार्गेट आरोग्य विभागला दिली आहे. त्यातील आतापर्यत १७ हजार नागरिकांनी हा अॅप डाऊनलोड केले आहेत. तर फक्त १३०० नागरिकांनी या अॅपवर कचऱ्यासंदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. यातील ६० टक्के तक्रारीचे निवारण १२ तासांच्या आता झाले असून उर्वरित तक्रारीचे त्यानंतर निवारण झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. मात्र अॅप फक्त नावापुरता असून हा दिखावा असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वी पिसवली येथील नरेंद्र हिंदी हायस्कूल जवळील कचरा अनके दिवसांपासून पडल्याची तक्रार येथील रहिवाशी वंदना सोनावणे यांनी या अॅप नोंदवली होती. मात्र अद्याप या तक्रारीचे निवारण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारीपर्यत अॅप डाऊनलोड करण्याचे काम सुरु राहणार आहे.