सोलापूर बाजारातील आवक ही कांद्याचा दरासोबत वाढली

राज्यात शेतक-यांचा संप सुरू असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासह अन्य भाजीपाला व पालेभाज्यांची आवक पूर्वीप्रमाणेच आहे. कांद्याचे दर वाढल्याने शेतक-यांनी आपला कांदा बाजारात आणल्यामुळे सोमवारी कांद्याची आवकही वाढल्याचे दिसून आले.

दूध व शेतीमालाला बाजारात दर नसल्याने राज्यातील शेतकरी १० दिवसांच्या संपावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात संप सुरू असला तरी त्याचा म्हणावा तेवढा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेवर झालेला दिसत नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला, पालेभाज्या व फळभाज्यांची आवक काहीअंशी कमी झाली असली तरी हा परिणाम दरवर्षीप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले. कांद्याचे दर प्रतिक्विंटल ५०० रुपयांवर आले होते. बाजारात कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकºयांनी कांदा शेतातच गाढून टाकला. काहींनी मात्र आज ना उद्या कांद्याला चार पैसे वाढून येईल या अपेक्षेने जपून ठेवला आहे. मोठ्या कष्टाने कांद्याची जपणूक करुनही म्हणावा तितका भाव आजही कांद्याला नाही; मात्र काहीअंशी कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. दरात घसरण झाल्यानंतर दररोज सरासरी १०० ट्रकच्या जवळपास कांद्याची आवक होत होती. सोमवार दिनांक ४ जून रोजी १६२ ट्रक कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली होती. मागील आठवड्यात कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत गेली व शुक्रवारी-शनिवारी कांद्याचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपयांवर गेला होता. सोमवारी दरात १०० रुपयांची घसरण होऊन एक नंबरचा कांदा १३०० प्रति क्विंटलने गेला. ५०० ते १३०० रुपयांचा दर कांद्याला मिळाल्याने बाजार समितीतून सांगण्यात आले.
कांद्याप्रमाणेच पालेभाज्या, फळभाज्या व भुसारची आवक नेहमीप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले. आवकमध्ये कमी-अधिक काही प्रमाणात बदल दिसत असला तरी तो मे-जून महिन्यात दरवर्षी असतो असे सांगण्यात आले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email