सोनसाखळी चोरून ओला गाडीतुन पळुन गेलेल्या अट्टल चोराला अटक
नवीमुंबई – महिलेची सोनसाखळी चोरून ओला गाडीतुन पळुन गेलेल्या एका अट्टल चोराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.उत्तर प्रदेश येथून त्याला अटक करण्यात आली असून आता पर्यंत त्याच्याकडून खारघर परीसरातले याप्रकारचे तीन गुन्हे उघडकीला आले आहेत.तर मुंबईत त्याच्यावर याप्रकारचे दहा गुन्हे दाखल आहेत.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की आक्रम अख्तर खान (३२) हा भाड्याने ओला कार चालवायचा १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तो खारघरमध्ये आला होता. यावेळी तो रस्त्यावरून जाणा-या एका महिलेची सोनसाखळी खेचून ओला कारमधून पळाला.यानंतर कार ठाणे रेल्वे स्थानकाजवळ थांबवून तो उत्तर प्रदेश येथे पळून गेला . याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून आरोपी ज्या ओला कारमधून पळून गेला होता, त्या कारचा नंबर मिळवला.कारमालकाकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर घेवुन पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील त्याच्या वास्तव्याचा शोध काढून तेथे त्याला अटक केली. खारघर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस हवालदार शंकर जाधव, बाबाजी थोरात, पोलिस नाईक उमेश नेवारी, प्रमोद वाघ, संतोष भोकरे, आदींच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास करुन ही कारवाई केली आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने खारघर परीसरात केलेले याप्रकारचे तीन गुन्हे उघडकीला आले आहेत. या तिन्ही गुन्ह्यातील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.तर मुंबईत त्याच्यावर याप्रकारचे दहा गुन्हे दाखल असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.