सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र म्हणजे उद्योजकतेचा आरंभ- श्रीपाद नाईक
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक विकासात फार महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र (एमएसएमई) हे उद्योजकतेची प्राथमिक अवस्था म्हणजे एकप्रकारे आरंभ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक आज दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
नवी दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसएमई क्षेत्रासाठी केलेल्या घोषणांचे यावेळी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. बँका, ईपीएफओ, डीजीएफटी, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या विविध विभागांनी यावेळी आपले सादरीकरण केले. एमएसएमई आऊटरीच आणि सपोर्ट कार्यक्रमांतर्गत 100 दिवसांसाठी निवडलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये उत्तर गोवा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. राज्यात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी या निमित्ताने उपलब्ध होईल, अशी अपेक्षा श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. नव उद्योजकांना कर्जासाठी आता 20 ते 25 दिवस थांबावे लागणार नाही, केवळ 59 मिनिटांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व प्रक्रियेवर पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवणार आहेत.