सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या मांगले दाम्पत्याला अटक
(श्रीराम कांदू )
शासनाच्या बहुचर्चित समृध्दी मार्गाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या सतिश आणि त्यांची पत्नी श्रध्दा मांगले यांना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याबद्दल मध्यंतरी एक ध्वनीफित प्रसारीत झाली होती. ही ध्वनीफित सतिश मांगले आणि त्यांची दुसरी पत्नी श्रध्दा मांगले यांनी प्रसारीत केली होती. २३ ऑक्टोबरला सतिश, त्यांची पत्नी श्रध्दा आणि त्यांचा मित्र अनिल वेदमेहता यांनी मोपलवार यांच्या ओळखीच्या क्लिंग मिश्रा यांच्यामार्फत संपर्क साधून त्यांना खारेगाव टोलनाका येथे बोलवून घेतले आणि मोपलवार यांच्याविरूध्द केलेले सर्व आरोप मागे घेण्यासाठी तसंच ध्वनीफित परत करण्यासाठी १० कोटी रूपये देण्याची मागणी केली. त्यानंतर शांग्रिला हॉटेल इथेही पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा ३१ ऑक्टोबरला जे डब्ल्यू मेरिएट येथे मोपलवार यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यात आली आणि त्यांच्याशी तडजोड करून ही रक्कम ७ कोटी पर्यंत खाली आणण्यात आली. ही रक्कम न दिल्यास तसंच पोलीसांकडे तक्रार केल्यास मोपलवार यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. काल या ७ कोटींच्या खंडणीपैकी १ कोटीची रक्कम स्विकारताना डोंबिवलीतील लोढा पालवा येथे सतिश मांगले यांना खंडणी विरोधी पथकानं रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २ लॅपटॉप, ५ मोबाईल हँडसेट, ४ पेन ड्राईव्ह, १५ सीडी, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. मांगले यांना वरिष्ठ अधिका-यांशी संबंध ठेवून त्यांचे फोनवरील संभाषण नोंदवण्याची सवय होती अशी माहिती पोलीस आयुक्तांनी या पत्रकार परिषदेत दिली.