श्रीगोंदा पोलिसांचा ९ रोडरोमियोंना चोप,राजकीय पदाधिकारी टवाळखोर मुलांच्या पाठीशी !
(म.विजय)
नगर – श्रीगोंदा शहरातील कन्या विद्यालयाच्याबाहेर दररोज मुलींची छेडछाड करून त्यांना टवाळ मुलं त्रास देत असल्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे मुलींचे पालक व शाळा व्यवस्थानणाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर तातडीने दखल घेत श्रीगोंदा पोलिस निरीक्षकांनी साध्या वेशात पोलिस पथकास शाळा भरण्याच्या वेळेस पाठवली असता मुलींजवळून जाऊन जोराने हॉर्न वाजावणे, मुलींकडे पाहून गैरवर्तणुक करणे असे प्रकार पोलिसांच्या लक्षात आले.
तेव्हा पोलीस कर्मचारी अविनाश ढेरे, अमोल अजबे व औटी यांनी टारगटपणा करणाऱ्या जवळपास ९ टवाळखोर मुलांना पकडून चांगलाच चोप देऊन श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हे सर्व मुलं अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावून घेत या मुलांना चांगलेच खडसावत त्यांच्या भवितव्याचा व शिक्षणाचा विचार करून त्यांना समज देऊन सोडून दिले.
पोलिसांनी केलेल्या टवाळखोर मुलांवरील या कारवाईचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच श्री. पोवार यांनी इथून पुढच्या काळातदेखील या टारगट मुलांवर अशीच कारवाई करणार असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.