शैक्षणिक संस्थांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवाव्यात- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.२२ – खासगी क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी आपल्या संस्थांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात आणि सवलतीच्या दरात शिक्षण पुरवावे, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. पंजाबमधील फगवाडा इथल्या लवली प्रोफेशनल युनिर्व्हसिटीच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना उद्योग आणि खाजगी क्षेत्राने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
अनेक संस्था पदवीप्रमाणपत्र देणारे कारखाने ठरत असून विद्यार्थ्यांमधल्या रोजगार कौशल्याच्या अभावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थी, रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार निर्माते कसे होतील तसेच ते चांगले आणि जबाबदार नागरीक कसे होतील याकडे संस्थांनी लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. कृषी शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांबरोबर वेळ व्यतीत केला तर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची त्यांना जाण येईल असे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षेबाबत देश स्वयंपूर्ण होण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.