शेतीची उत्पादकता वाढविण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे याचे शेतकऱ्यांना आवाहन

(श्रीराम कांदु)

कृषि दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेने केला शेतकऱ्यांचा व महिला बचत गटांचा गौरव.

ठाणे दि.०१ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव म्हणून त्यांचा 1 जुलै हा जन्मदिन “कृषी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांमुळे आज शेतकऱी दर्जेदार उत्पादन व उत्पन्न घेत आहे. आपला ठाणे जिल्हा सर्वात जास्त नागरीकीकरण झालेला जिल्हा असला तरी आजही जिल्ह्यात शेतकरी बांधवाची संख्या लक्षणीय आहे. शेतकऱ्यांनी शेतीची उत्पादकता व दर्जा वाढविण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असे मत ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन भवन येथे “कृषि दिन” साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उपाध्यक्ष सुभाष पवार , कृषि व पशुसंवर्धन सभापती उज्वला गुळवी , महिला व बाल कल्याण सभापती दर्शना ठाकरे , समाजकल्याण सभापती निखिल बरोरा , कल्याण पंचायत समिती सभापती दर्शना जाधव , कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अनंत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप देशमुख, प्रकल्प संचालक, डॉ. रुपाली सातपुते, कृषि विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी.व्हाय.जाधव ,शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उपकार्यकारी अभियंता श्रीमती तायडे आदि मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया

यावेळी पालकमंत्री म्हणाले , शेतकऱ्याच्या कष्टामुळे, मेहनतीमुळे आपल्याला चार घास मिळतात. त्यामुळे ज्या-ज्या वेळी शेतकरी संकटात असेल त्या-त्या वेळी आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. शेतकरी कायमस्वरूपी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा स्वरूपाच्या योजना राबवायला हव्यात. ठाणे जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणीदार कामे झाली आहेत. अनेक ठिकाणे गाळउपसा करून पाण्याची साठवण करण्याचे काम केले आहे.

जिल्ह्याला हिरवेगार बनवण्यासाठी बारमाही पीके घ्यायला हवीत असेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात ठाणे जिल्हा केवळ राज्यातच नव्हे तर देशात पहिला क्रमाकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येण्यासाठी आपण सगळ्यांनी शेती बरोबर विविध क्षेत्रातही शाश्वत कामे करूया असेही ते म्हणाले.

पारंपारिक शेती न करता सध्या जगात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वापर करुन शाश्वत शेतीवर भर देवूया.

भारत देश कृषि प्रधान असल्याने आजही 60 % लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र वातावरण बदलामुळे शेती संकटात आहे. त्यामुळे सध्या देशात भीतीचे सावट असल्याची परिस्थीती असली तरी या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला काही उपाय योजना करायला हव्यात. त्यासाठी सर्व प्रथम शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. ते म्हणाले , शाश्वत शेती करण्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन आणि उपाय योजनांची अमलबजावणी करायला हवी. देशाचे उत्पन्न २०२२ झाली दुप्पट करण्यासाठी एका कमिटीची नेमणूक करण्यात आली. त्या कमिटीने शेतीकडे पाहण्याच्या दृष्टीकोना सोबत शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचे सुचवले असून शेतीवर , शेतीकरिता , शेतीव्यतिरिक्त या तीन पद्धतीनुसार शेती व्यवसायाकडे पाहायला हवे असे सांगितले आहे.

या कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दाम्पत्य आणि शेती क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा दरम्यान जिल्हा परिषदेने शेतकर्यासाठी तयार करण्यात आलेल्या हरित पाने या कृषि योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याच बरोबर प्रगतशील शेतकरी दाम्पत्याचा व महिला बचत गटांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email