शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे लाभ मिळण्यासाठी त्याचा जलद प्रसार होणे आवश्यक-उपराष्ट्रपती

मुंबई, दि.२४ – देशातल्या संपूर्ण कृषी क्षेत्राला नवी दिशा देणे गरजेचे असून आपले लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नांमध्ये अचूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. मुंबईत आयोजित कृषीसाठी माहिती तंत्रज्ञान विषयक आशिया-प्रशांत महासंघाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. याच कार्यक्रमात कृषी क्षेत्रात संगणकांविषयीची जागतिक परिषदही आयोजित करण्यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी मुंबईने या दोन्ही परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदेची संकल्पना ‘कृषी क्षेत्रात अचूकता आणण्यासाठी संशोधन’ अशी होती.

कृषी क्षेत्रात संशोधन करतांना त्यात अचूकता आणणे किंवा जमिनीच्या पोतानुसार पिकांचे व्यवस्थापन करणे ही उत्तम पीक उत्पादनाची गुरूकिल्ली आहेच शिवाय त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचेही संरक्षण होऊ शकते, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

नागरी आणि ग्रामीण भागातील दरी फार काळ राहणे योग्य नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातल्या लोकांचे जीवनमान सुखी करण्यासाठी हे तंत्रज्ञान जलद गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे, असे ते म्हणाले. कृषी क्षेत्र एकाच वेळी शाश्वत आणि उत्तम नफा देणारे बनविण्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान स्वीकारायला हवे. यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न मिटेल शिवाय जीवन जगण्यासाठीच्या संधींमध्येही वाढ होईल. शेतीसोबत मत्स्यव्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन अशा संलग्न उद्योगांना चालना द्यायला हवी.

भारतात कृषी हा महत्त्वाचा व्यवसाय असून त्यात फायदा होण्यासाठी नवी साधने आणि उपकरणे वापरुन शेतीचा खर्च कमी करायला हवा. त्याशिवाय हवामान आणि पणन या दोन क्षेत्रात शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

भारतात शेतीचे हेक्टरी उत्पादन वाढवण्याची गरज आहे तसेच पाणी, ऊर्जा आणि इतर संसाधनांचा समतोल वापर करणेही आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email