शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दोन दिवसांत १० हजार गरजूंनी घेतला लाभ

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आरोग्य यज्ञाचे आयोजन,मंगळवारी अखेरचा दिवस

(म.विजय)

ठाणे – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा”च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रविवार आणि सोमवारच्या दोन दिवसांत तब्बल १० हजार ठाणेकरांनी या शिबिराचा लाभ घेतला. तब्बल ३५०हून अधिक डॉक्टर्स आणि तितकेच निमवैद्यकीय कर्मचारी असे सुमारे ७०० जणांचे पथक सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी करत आहेत. संपूर्णतः विनामूल्य असलेल्या या वैद्यकीय शिबिरात सुमारे २ कोटी रुपयांची औषधे विनामूल्य देण्यात येत असून गरजू रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.

नेत्ररोग, हृदयरोग, कर्करोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, मधुमेह, श्वसनाचे विकार, त्वचारोग, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी व उपचार केले जाणार असून आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांवर देखील या शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात लहान मुलांच्या हृदयाची 2Dइको तपासणी होणार नाही, परंतु या शिबिरात 2Dसाठी विशेष नाव नोंदणी करण्यात येईल. नाव नोंदणी केलेल्या लहान मुलांची जून महिन्यात ठाणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोफत 2D इको तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत/सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील

ठाण्याच्या किसन नगर-२ येथील नेपच्यून एलिमेंट(जुने टाटा कन्सल्टन्सी कार्यालय), रोड नंबर २,वागळे इस्टेट या ठिकाणी २९, ३० एप्रिल आणि १ मे अशा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन रविवार, २९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, माजी महापौर संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, परिवहन सभापती अनिल भोर, सदस्य राजेंद्र महाडिक, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे चाप्टरचे अध्यक्ष दिनकर देसाई, वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. भोर आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या महाआरोग्य तपासणी शिबीराचा समारोप मंगळवार, १ मे रोजी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरीकार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे  शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांनाशस्त्रक्रियासाठी आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यातयेते. गेल्या साडे पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० गरजू रुग्णांना अंदाजे तीन कोटी रुपयांपर्यंतची मदत या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ  डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारावर रुग्णांची तपासणी व निदान करण्यात येत आहे. निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधे त्वरित देण्यात येत असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत किवा सवलतीच्या दरात ठाण्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे.

अधिकाधिक नागरिकांनी या विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email