शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एक लाख १५ हजारांचा गंडा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – नोकरीच्या शोधात असणाऱ्या डोंबिवली पूर्वेकडील एका ३० वर्षीय तरुणीला कॉलेज मध्ये शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल एक लाख १५ हजारांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सदर पिडीत तरुणीने विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अर्जुन पोपली या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील कर्वे रोड काशीकुंज सोसायटी मध्ये राहणारी सदर पिडीत ३० वर्षीय तरुणी उच्चशिक्षित असून नोकरीच्या शोधात होती. याचा फायदा घेत अर्जुन मुन्निश्वर पोपली याने गेल्या वर्ष भरापासून ठाणे वर्तक नगर येथील एका कॉलेज मध्ये शिक्षिकेची नोकरी लावतो असे सांगत तिच्याकडून गेल्या काही महिन्यात तब्बल १ लाख १५ हजार रुपये उकळले मात्र पैसे देवूनही नोकरी बाबत काहीच हालचाल होत नसल्याने सदर तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अर्जुन मुन्निश्वर पोपली विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.