शास्त्रीनगर रुग्णालयात सुरू होणार शवविच्छेदनाची सुविधा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
(श्रीराम कांदु)
आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुक्तांसोबत घेतली बैठक
५० रिक्त जागा तातडीने भरणार
नागरिकांना सक्षम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल
कल्याण दि.०७ – कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली. त्याचबरोबर डॉक्टरांवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांची ससेहोलपट थांबवण्यासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातही शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याचीही मागणी केली. या दोन्ही मागण्या आयुक्त बोडके यांनी मान्य केल्या असून रिक्त जागांची भरती येत्या आठवड्याभरात सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेची आरोग्यसेवा सक्षम करण्याबाबत, तसेच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात खा. डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. याप्रसंगी महापौर विनिता राणे, सभागृह नेते राजेश मोरे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, महानगरप्रमुख विजय साळवी, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक विश्वनाथ राणे, दशरथ घाडिगावकर, मोहन उगले, आरोग्य अधिकारी डॉ. राजीव लवंगारे आदी उपस्थित होते. सध्या महापालिकेच्या कल्याण येथील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा असून डोंबिवली विभागातील मृतदेहही येथेच शवविच्छेदनासाठी आणले जातात. त्यामुळे येथील डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण असून एका डॉक्टरांना महिन्याला किमान ३० ते ४० शवविच्छेदन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णसेवेबरोबरच शवविच्छेदनाचेही काम करावे लागत असल्यामुळे रुग्णसेवेवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे.
या बाबी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त बोडके यांच्या निदर्शनास आणून दिल्या. डोंबिवली विभागातील मृतदेहांच्या शवविच्छेदनाची जबाबदारी त्या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच सोपवण्याचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचवले होते. त्याला सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्यताही दिली होती. मात्र, केवळ तोंडी ठरलेल्या या निर्णयाची अमलबजावणी न झाल्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष असल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले. तसेच, शास्त्रीनगर येथे शवविच्छेदनाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातलगांबरोबरच पोलिसांचीही फरफट होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शास्त्रीनगर येथे लवकरात लवकर शवविच्छेदनाची सुविधा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मानद तत्त्वावर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांचे पॅनेल तयार करण्याची सूचनाही खा. डॉ. शिंदे यांनी केली. तीही आयुक्त बोडके यांनी उचलून धरली असून डॉक्टरांनीच असे पॅनेल तयार करावे, महापालिका त्याला मंजुरी देईल, असे त्यांनी सांगितले. शास्त्रीनगर आणि बाई रुक्मिणीबाई या दोन्ही रुग्णालयांसाठी स्थानिक पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलची सोय उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली असून त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना दिलासा मिळून वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे कामही तातडीने हाती घेण्यात येईल, असे श्री. बोडके यांनी सांगितले.