शासकीय रुग्‍णालयांत वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसतील,तर डायल करा 104 क्रमांक-आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

उद्यापासून सेवेचा शुभारंभ
(म विजय )

मुंबई, दि. 31: प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण व उपजिल्‍हा रुग्‍णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या 104 क्रमांकांवर तक्रार करावी. केंद्राच्या माध्यमातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना त्‍वरीत रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले जाईल. उद्यापासून (दि. 1 नोव्हेंबर) राज्यभर ही सुविधा सुरू होत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयस्‍तरावर गंभीर रुग्‍ण उपचारासाठी येत असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास रुगणांची गैरसोय होते. त्‍यांना वेळेत उपचार मिळत नाही. अशा परिस्थितीत नातेवाईकांना कोणाशी संपर्क करावा हे सुचत नाही. याची दखल घेत आरोग्य विभागाने 104 (टोल फ्री) क्रमांक सुरू केला आहे. आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्रात तक्रार दाखल होऊन रुग्‍णाच्या नातेवाईकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत माहिती देण्यात यल. त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील. जर वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क न झाल्‍यास त्‍या तालुक्‍यातील तालुका आरोग्‍य अधिकाऱ्यास व त्‍यापश्‍चात जिल्‍हा आरोग्‍य अधिकाऱ्यास सदर तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत कळविण्‍यात येईल.

आपत्‍कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास हा अमुल्‍य (Golden Hours) असतो. सदरील कालावधीत रुग्‍णांवर उपचार झाल्‍यास त्यांना होणारा त्रास, मृत्‍यूदर कमी होण्यास मदत होईल.जेणेकरुन रुग्‍णांचा सार्वजनिक आरोग्‍य सेवेवरचा विश्‍वास अधिकाधिक दृढ  होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या सुविधेमुळे वैद्यकीय अधिकारी जवळच उपलब्‍ध असल्‍यास त्‍वरीत उपचार करण्‍यात येईल व ज्‍या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध होऊ शकणार नाही समजा वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणासाठी अथवा बैठकीस गेले असल्‍यास रुग्‍णाला वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध असलेल्‍या नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात संदर्भित करण्‍यात येईल.

ग्रामीण व उपजिल्‍हा रुग्‍णालयासाठी वैद्यकीय अधिकारी /आपत्‍कालीन वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास संबंधित रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिक्षकांस संपर्क करण्‍यात येईल व त्‍यापश्‍चात जिल्‍हास्‍तरावरील अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांस सदर तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत कळविण्‍यात येईल.

ही सुविधा देताना ज्‍या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसुचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असेल आणि त्याच्यामुळे गंभीर रुग्‍णाला वेळेत उपचार न मिळाल्‍यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्‍यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email