शाळा आणि विद्यार्थ्यांचीही मोठी सोय,शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क अशा लाभासाठी आता महाडीबीटी पोर्टल
( श्रीराम कांदु )
ठाणे दि १; अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता व इतर फीचा लाभ महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी कळविले आहे.
संकेतस्थळावर अर्ज अपलोड करण्यात काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास टोल फ्री क्र. 18001025311 किंवा mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. विभागातील कर्मचाऱ्यांना देखील याबाबत योग्य प्रशिक्षण देण्यासाठी ३ प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ), कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती व संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीविषयक योजनांसाठी हे पोर्टल उपलब्ध केल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होणार आहे.
विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड क्रमांक बॅंक खात्याशी संलग्नित करुन घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत
विद्यार्थ्यांनी या पोर्टलवरील युजर मॅन्यूअल एफएक्यूचा वापर करुन व पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत, त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्न करुन घ्यावे.पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतंत्र युजर आयडी तयार करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.