शहापूर येथे शासकीय योजनांचे शिबीर एकाच ठिकाणी मिळणार अनेक योजनांचा लाभ
मुख्य न्यायमूर्ती उद्घाटनासाठी येणार
ठाणे ९ : राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि तालुका विधी सेवा समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने ११ मे रोजी वन प्रशिक्षण केंद्र शहापूर येथे एकाच ठिकाणी सर्व शासकीय योजनांचा लाभ देणारे शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्रीमती व्ही.के.ताहिलरमानी, न्यायमूर्ती अभय ओक, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनय जोशी, राज्य विधी सेवाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान पार पडणाऱ्या या शिबीराचे वैशिष्टये म्हणजे याठिकाणी शासकीय विभागातर्फे असणाऱ्या योजनांची फक्त माहिती दिली जाणार नसून शासकीय विभागांची पूर्ण माहिती येथे दिली जाणार आहे तसेच त्याच ठिकाणी आधारकार्ड,रेशन कार्ड, दिव्यांगाच्या योजना तसेच इतर योजनांचा थेट लाभ दिला जाईल असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दि.य. गौड यांनी सांगितले.
शहापूर तसेच आसपासच्या भागातील नागरिकांनी , शेतकरी तसेच ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन ११ मे रोजीच्या या शिबीरास उपस्थित राहुन प्रत्यक्ष लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.