शरीर संबंधास नकार दिल्याने मॉडेलची हत्या
मुंबई – चार दिवसांपूर्वी मालाड येथे झालेल्या एका मॉडेल मानसी दिक्षितच्या खून प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. मानसीने आरोपी सय्यदसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. सय्यदने बांगुर नगर पोलिसांना दिलेल्या जबानीत हे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी काही दिवसांपूर्वी तिच्या राजस्थान येथील घरी गेली होती. रविवारी ती मुंबईत परतली. सय्यद देखील त्यावेळी त्याच्या गावी हैदराबादला गेला होता. सोमवारी त्या दोघांनीही भेटण्याचे ठरवले. त्यासाठी मानसी सय्यदच्या अंधेरी मित्तल नगर येथील घरी गेली होती. त्यावेळी सय्यदच्या घरी कुणीही नव्हते. तिच संधी साधून सय्यदने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र मानसीने त्याला नकार दिल्याने सय्यद चिडला व त्याने तेथील एका जड वस्तूने तिच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मानसी बेशुद्ध झाली पण तरी ती जिवंत होती. मात्र त्यानंतर सय्यदने रश्शीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये मानसीचा मृतदेह भरला व तो कॅब करून मालाडला घेऊन आला.