विष्णुनगर पोस्ट ऑफिसच्या पुनर्विकासाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी
राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचा सकारात्मक प्रतिसाद
(श्रीराम कांदु)
ठाणे – डोंबिवलीतील विष्णु नगर पोस्ट ऑफिसच्या जीर्ण इमारतीचा पुनर्विकास व्हावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील असून कल्याण-डोंबिवली महापालिकेने ही इमारत बांधून देण्याच्या बदल्यात तळ मजल्यावर टपाल कार्यालय आणि वरच्या मजल्यावर नागरी सुविधा कार्यालये सुरू करण्यात यावीत, अशी मागणीखा. डॉ. शिंदे यांनी टपाल खात्याचे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्याकडे केली आहे. खा. डॉ. शिंदे यांनी श्री. सिन्हायांची दिल्ली येथे भेट घेतली असता सिन्हा यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून लवकरच या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव टपाल खात्याच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला जाईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
क्ल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली (प.) येथील विष्णु नगर पोस्ट ऑफिसची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्यामुळे या पोस्ट ऑफिसचे तात्पुरत्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. टपाल खात्याची स्वतःची जागा असूनही भाड्याच्या इमारतीतून कारभार चालवला जात असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेने २०१४ साली विष्णु नगर येथील जुन्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून टपाल विभागाला पाठवला होता. परंतु, या प्रस्तावाबाबत टपाल विभागाकडूनकाहीही प्रतिसाद मिळाला नाही.
या पार्श्वभूमीवर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून नवी दिल्लीत राज्यमंत्री सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली; तसेच टपाल विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक नरेश सिकेरिया यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस इमारतीचा पुनर्विकास होणार असेल तर टपाल विभागाची काहीही हरकत नसून त्याबाबतची एनओसी देण्यात येईल,असे सिन्हा यांनी खा. डॉ. शिंदे यांना सांगितले. सिकेरिया यांनीही कल्याण-डोंबिवली महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव पाठवल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
Hits: 16