विवाहितेच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून कंपनी मालकाचा बलात्कार – डोंबिवलीतील घटना

एका ३१ वर्षीय विवाहितेशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत, खाजगी कंपनीचा मालक असलेल्या नराधमाने तिच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बेशुद्ध अवस्थेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने बलात्कार करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तिला बदनामीची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

धमकीमुळे पीडिता भयभीत झाल्याचा फायदा घेत, या नराधमाने पिडीतेच्या भावाला स्वत:च्या कंपनीत डायरेक्टर बनवून त्यांच्या नावे तब्बल ५७ लाखांचे कर्ज काढून फसवणूक केली. या प्रकरणी पिडीत विवाहितेने मानपाडा पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत त्या नराधमावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही तासातच नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. महेश परब असे नराधमाचे नाव असून तो डोंबिवलीतील एका खाजगी कंपनीचा मालक आहे.

पिडीत विवाहिता डोंबिवली पश्चिम परिसरात राहत असून तिची नराधम महेशशी आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत महेशने तिला फेब्रुवारी २०१४ मध्ये एका हॉटेलमध्ये जेवण्यास बोलावले होते. त्यावेळी तिच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले होते. त्यानंतर नराधमाने तिच्यावर त्याच हॉटेलच्या एका खोलीत बलात्कार केला. हा नराधम इथेच थांबला नाही तर त्याने या दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर व्हिडीओ क्लिप सगळ्यांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत, तिच्यावर विविध ठिकाणी नेवून तिच्यावर जानेवारी २०१८ पर्यत बलात्कार केला.

वारंवार होणाऱ्या अत्याचार व भावाची फसवणूक केल्यामुळे अखेर पिडीत विवाहितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन करताच मानपाडा पोलिसांनी नराधमावर बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी महेशला बेड्या ठोकल्या असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email