विनयभंग प्रकरणी साई मंदीरप्रमुख जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
नगर – शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची संस्थान प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चौकशीत दोषी आढळल्यास मंदिर प्रमुखावर कठोर कारवाई केली जाईल, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सांगितले.
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात देश-विदेशातून रोज सरासरी लाखभर भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे साई मंदिर आणि परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते. शिर्डीपासून पाच किलोमीटर अंतरावरील वाबळे मळा येथे राहणारी एक साईभक्त महिला मैत्रिणींसह गुरुवारी रात्री साडेआठ वाजता मंदिरात दर्शनास आली होती.
साईबाबा समाधीचे दर्शन घेत असताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व पुन्हा साई मंदिरात यायचे नाही, अशी धमकी दिली. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर शिर्डी पोलिसांनी साई मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्या विरोधात कलम ३५४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. साई मंदिरात दर्शन घेताना पुरुष तसेच महिलांना सतत धक्काबुक्की होते. मंदिरातील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांचे वर्तन उद्धट असते. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. साई संस्थानाचे चेअरमन होण्यापूर्वी साई मंदिरात दर्शन घेताना डॉ. सुरेश हावरे यांनाही धक्काबुक्की झाली होती.