विद्यार्थ्याशी अश्लिल वर्तन ; जाब विचारणा-या पालाकावर जीवघेणा हल्ला
बदलापूर – स्कुलबस चालकाला विद्यार्थ्याशी अश्लिल चाळे केल्याचा जाब विचारणा-या पालकावर बसचालकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरात घडली. या हल्ल्यात पालक मंगेश तारोळे- पाटील हे जखमी झाले असून, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बदलापूर येथे राहणारे मंगेश तारोळे- पाटील यांचा मुलगा लोकेश हा गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. बसचालक रवी लवाटे हा लोकशबरोबर अश्लिल चाळे करणे तसेच डोळे वटारून धमकी देणे असे प्रकार करीत असे. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने लोकेशने हा प्रकार पालकांना सांगितला होता. तसेच या भितीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. पालक मंगेश पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसमधील दुस- या चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे पाटील यांनी बसचे मालक प्रसाद म्हस्कर यांच्याकडे त्या चालकाची तक्रार केली. बसमालकाकडे तक्रार केल्याने रागावलेल्या बस चालकांनी त्यांना जबर मारहाण करीत जीवघेणा हल्ला चढविला गंभीररित्या जखमी झालेले पालक मंगेश पाटील यांच्यावर उल्हासनगरमधील सेंट्रल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.